सोमवार, ४ जुलै, २०१६

महाराष्ट्रातील काही गड व त्यांची माहिती

मल्हारगड
इतिहास : या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम १७५७ ते १७६० या काळात झाले. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.
पहाण्याची ठिकाणे :  पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात.किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे बालेकिल्ल्याच्या तटाला लागून आहे. बालेकिल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. बुरुजाच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा : १) सासवडहून :-
सासवड पासून ६ किमी वर सोनोरीहे गाव आहे. या गावाला एसटी सासवडहून निघून दिवसातून तीन वेळा म्हणजे स १०, दु २ आणि संध्या ५ या वेळेत भेट देते. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. पायथ्या पासून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.



मंडणगड
इतिहास :मंडणगड किल्ला राजा भोज याने बांधला असे म्हटले जाते. १६६१ साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदारच्या ताब्यात होता. शिवाजी राजे पन्हाळ्यात अडकुन पडले होते, तेव्हा याच दळवींनी विशाळगडाला वेढा दिला होता. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच जसवंतराव दळवींची तारांबळ उडाली व मंडणगड व आपली जहागिरी सोडून तो शृंगारपूरला पळून गेला. महाराजांना न लढताच हा किल्ला मिळाला. काही काळ हा किल्ला सिध्दी व नंतर आंग्य्रांकडे होता. १८१८ साली इंग्रजांनी तो जिंकला.
पहाण्याची ठिकाणे :मंडणगड किल्ला दोन शिखरांचा आहे. उजव्याबाजूकडील थोड्याश्या उंच शिखरावर फक्त एक पाण्याच टाक पहाता येते. बाकी रान माजलेले आहे. डाव्या बाजूकडील काहीशा सपाट शिखरावर किल्ला आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही, पण त्याच्या बाजूचे बुरुज अजून उभे आहेत. गडावर दोन पाण्याचे तलाव आहेत. गडाची तटबंदी काही ठिकाणी शाबूत आहे. गडावर गणेशाचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. गडावरुन सावित्री नदीचे पात्र, रायगड, व वरंधा घाट स्वच्छ वातावरणात दिसू शकतात.
पोहोचण्याच्या वाटा : मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण किल्ल्यापासून २ किमी वर आहे. मुंबई - गोवा महामार्गावर महाडच्या अलिकडील "टोल" नावाचा फाटा आहे.(टोल नाका नव्हे.) या फाट्यावरुन आंबेत - म्हाप्रळ मार्गे मंडणगडला जाता येते. मंडणगड गावातून २ किमी वर किल्ल्याच्या पायथ्याशी धनगरवाडी आहे, तेथपर्यंत गाडी जाते. धनगरवाडीतून २० मिनीटात गडावर जाता येते
मानगड
पहाण्याची ठिकाणे :मानगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी पठारावर विंझाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या पाठिमागून गडावर जाण्यासाठी कातळात खोदून काढलेल्या पायर्‍या आहेत. त्यानंतर किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हे प्रवेशद्वार व त्याबाजूचे बुरुज अजून सुस्थितीत आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डावीकडे पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरे उध्वस्त प्रवेशद्वार लागते. याची कमान पुर्णपणे ढासळलेली आहे. कमानीच्या एका तुकड्यावर नागशिल्पकोरलेले आहे. या द्वारातून आत शिरल्यावर डावीकडे राहण्यायोग्य गुहा आहे. गुहेजवळच खांब टाके आहे. वाटेच्या दुसर्‍या बाजूला असलेले पाण्याचे टाके बुरुजातच खोदलेले आहे.दुसर्‍या प्रवेशद्वारापासून एक वाट उजवीकडे मानगड माचीकडे जाते. माचीवर जमिनीवरील खडकात खोदलेली ६ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या आजूबाजूला चांगलेच गवत माजलेले आहे. हे पाहून पून्हा प्रवेशद्वारापर्यंत मागे येऊन तटबंदीच्या कडेने बालेकिल्ल्यावर जाता येते. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच वाड्याचे चौथरे आहेत. त्याच्या बाजूलाच उध्वस्त मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात.मागच्या बाजूला खाली दरीत पाण्याचे एक टाक आहे,ते पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्यावर गेल्यावर, तेथे पाण्याची दोन टाकी पाहायला मिळतात. यातील पाणी पिण्यायोग्य आहे.मानगडच्या माथ्यावरुन सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे मोहक दृश्य दिसते वातावरण चांगले असल्यास रायगडचेही दर्शन होते. 
पोहोचण्याच्या वाटा :१) मुंबई - गोवा मार्गावरील माणगाव पासून मानगड १७ किमी अंतरावर आहे. माणगावहून बस किंवा रिक्षाने १० किमी वरील निजामपूर गाठावे. तेथून ४ किमी वर बोरवाडी मार्गे ३ किमी वरील मशिदवाडी या मानगडच्या पायथ्याच्या गावात जाता येते. गावात येणारा डांबरी रस्ता जिथे संपतो, तेथून सिमेंटचा रस्ता चालू होतो. या रस्त्याच्या टोकाला एक पायवाट डावीकडे जाते. या पायवाटेने किल्ला डाव्या हाताला ठेवून आपण खिंडीपर्यंत येतो. खिंडीत असलेल्या मंदिरामागून पायर्‍यांची वाट गडावर जाते.


मंगळगड
इतिहास : १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी मंगळगडजिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे : पूर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट असलेल्या मंगळगडाचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही. आत गेल्यावर उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याकडे जाते व डाव्या बाजूची वाट पूर्वपश्चिम पसरलेल्या माचीवर जाते. माचीवर कांगोरी देवीचे मंदीर आहे. डाव्या हाताला दगडात कोरलेल पण आता बुजलेले टाक दिसत. या टाक्याजवळ किल्ल्यावर सापडलेल्या अनेक मुर्ती ठेवलेल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदिर दगडी जोत्यावर बांधलेले आहे. १० पायर्‍या चढून मंदिरात गेल्यावर प्रवेशद्वाराची विटांनी बनवलेली अर्धवर्तुळाकार कमान दिसते.मंदीराच्या गाभार्‍याबाहेर भिंतीला टेकून दगडी भग्न मूर्त्या ठेवलेल्या आहेत.
पोहोचण्याच्या वाटा : १) ठाण्याहून रात्री सुटणार्‍या पिंपळवाडी बसने दुधाणेवाडी/कांगोरीगड या बस थांब्यावर उतरावे. बस थांब्यावरच कांगोरी सिध्देश्वराचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच टेकडी आहे.
मांगी-तुंगी
इतिहास :बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली.
पहाण्याची ठिकाणे :मांगी सुळक्याच्या पोटातील गुहांमधे महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यातील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती. बलभद्र म्हणजे श्रीकृष्णाचा भाऊ बलराम, जैन पुराणात त्याचा बलभद्र म्हणुन उल्लेख येतो. बलभद्राची मुर्ती पाठमोरी कोरलेली आहे. डोंगराकडे तोंड करुन तपाला बसल्यामुळे आपल्याला त्याची केवळ पाठच पाहाता येते. मांगी तुंगी या दरम्यानच्या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्ण व बलराम यांच्या पादुका या डोंगर सोंडेवर आहेत. तिथेच एक पाण्याच कुंड आहे. त्याला कृष्णकुंड म्हणुन ओळखले जाते.
पोहोचण्याच्या वाटा :मांगी- तुंगीला जायचे असल्यास जाण्यासाठी नाशिक - सटाणा मार्गे (११३ किमी वरील) ताहाराबाद गाठावे. ताहारबाद - पिंपळनेर रस्त्यावर ताहाराबाद पासून ७ किमीवर डावीकडे जाणारा रस्ता भिलवड मार्गे मांगीतुंगीला जातो.
माणिकगड
पहाण्याची ठिकाणे :पायथ्याच्या वडगावातून गावाच्या मागिल डोंगरा आडून डोकावणारा माणिकगडाचा माथा दिसतो. परंतु तेथे पोहोचण्यासाठी आपल्याला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. प्रथम गावामागचा डोंगर चढुन गेल्यावर आपण ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून आपण किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणार्‍या बाजूच्या विरुध्द बाजूस येतो येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात. येथे सपाटीवर पाण्याच एक टाक आहे. त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याचा घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतो. पूर्वी याठिकाणी घाण्याचे दगडी चाक होते. आता ते गडावर दिसत नाही. चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे. चुन्याच्या घाण्याजवळून दोन वाटांनी आपल्याला किल्ला पाहाता येतो. सरळ चालत गेल्यास उत्तराभिमुख प्रवेशव्दारापाशी आपण पोहोचतो.. 
पोहोचण्याच्या वाटा :पनवेल किंवा खोपोली मार्गे माणिकगडाच्या पायथ्याच्या वडवली गावात जाता येते.
१) पनवेल - जुना मुंबई पुणे महामार्ग - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ किमी.आहे. 
मोरागड
इतिहास : इतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.
पहाण्याची ठिकाणे : गडमाथ्यावर जाताना दुसर्‍या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.
पोहोचण्याच्या वाटा : मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. मुल्हेरमाचीवर असणार्‍या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.
 
मुल्हेरगड
इतिहास :हा किल्ला तसा प्राचीन आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते.दुसर्‍या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मराठ्यांनी १६७१ मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला. पण किल्लेदाराने तो थोपवून धरला. मग मराठ्यांनी त्याचा नाद सोडला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठ्यांनी मुल्हेरगड काबीज केला. त्यानंतर पुन्हा किल्ला मोगलांच्या हातात पडला.पुढे इ.स १७५२ च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेर सकट खानदेशमधील सर्व प्रदेश मराठ्यांच्या हाती आला. यानंतर त्रिंबक गोविंद मुल्हेरचा किल्लेदार झाला. पुढे १७६५ मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आहेत. अशा रीतीने १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत सापडला.
पहाण्याची ठिकाणे :मुल्हेरगडाचे प्रामुख्याने २ भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि मुल्हेर बालेकिल्ला. गणेशमंदिरा पासून २ वाटा फुटतात, डावीकडे गेल्यावर १० मिनिटांतच सोमेश्वर मंदिर लागते. तर उजवीककडे जाणारी वाट आणि गणेशमंदिरा. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पठार लागते.टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. पठारापासून समोर जाणारी वाट राजवाड्यांच्या भग्न अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजादेखील आहे. राजवाड्यांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मण मंदिर लागते. राजवाड्यांच्या वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यांमधील खिंड लागते. सोमेश्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे ३ मजली चंदनबाव लागते.. सोमेश्वर मंदिर राहण्यासाठी उत्तम जागा आहे.
पोहोचण्याच्या वाटा : मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ किमीचे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे गेल्यावर डावीकडे एक घर लागते, आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. 


नारायणगड
इतिहास :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना सूपरीचित आहे. या आंबोलीतील "कावळेसाद" पॉंईंट्च्या विरुध्द बाजूस नारायणगड हा किल्ला आहे. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे.नारायणगड सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड सावंतांनी बांधला. पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते.
पहाण्याची ठिकाणे : नारायणगड किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. किल्ल्यावर सातेरी देवीचे स्थान आहे.गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड , पूर्वेला कावळेसाद पॉंईंट दिसतो. या ठिकाणी सांगितली जाणारी दंतकथा आणि सह्याद्रीच्या इतर भागात सांगितली जाणारी कथा यात विलक्षण साधर्म्य आहे. नारायणगड गड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेले आहे.
पोहोचण्याच्या वाटा :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाडी पासून ३२ किमी अंतरावर आहे. मुंबई पासून सावंतवाडी ५२१ किमीवर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते.












































































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा